“सातारा प्राईम न्युजच्या” बातमीने अनधिकृत गॅस विक्रेत्यांचा पर्दाफाश
शिरवळ – सातारा जिल्ह्यातील शिरवळमध्ये गॅस सिलेंडर काळाबाजार प्रकरण उघड झाल्यानंतर प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. पुरवठा विभाग मोहिम राबवत छापे टाकले. यात सुमारे ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा अवैध गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, दोन व्यक्तीवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, या प्रकरणात स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई झाली असली, तरी या काळाबाजाराला पाठबळ देणाऱ्या मोठ्या वितरकांवर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही, ही बाब नागरिकांच्या नाराजीचे कारण बनली आहे. स्थानिक पातळीवर ही अवैध विक्री केवळ काही दलाल आणि लहान विक्रेत्यांपुरती मर्यादित नसून, त्यामागे मोठ्या गॅस एजन्सी आणि वितरकांचे संगनमत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही अनधिकृत विक्रेत्यांकडून काळाबाजार सुरूच..
सातारा प्राईम न्यूज च्या बातमी नंतर खंडाळा पुरवठा विभागाने दखल घेत शिरवळ भागातील सांगवी या ठिकाणी दोन ठिकाणी छापे टाकत मोठी कारवाई केली. परंतु काही नागरिकांच्या मते ही कारवाई तुटपूज्य असून मोठ्या प्रमाणात काळाबाजार करणारे अनधिकृत गॅस विक्री करणारे हे बाजूलाच आहेत. यामुळे प्रशासनाने आता त्या मोठ्या अनधिकृत गॅस विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
वितरकांवर (एजन्सीवर) कारवाईची मागणी तीव्र
सध्या गॅस काळाबाजार करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांवर कारवाई झाली असली तरी मुख्य वितरक मोकाट सुटले आहेत. पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत गॅस सिलेंडर हस्तगत केले गेले, मात्र हे सिलेंडर कुठून आले, कोणत्या वितरकाने ते विकले, कोणत्या एजन्सीने याला परवानगी दिली? याचा सखोल तपास झालेला नाही.
नागरिकांच्या मते, जर वितरकांचा सहभाग नसता, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर काळ्या बाजारात कसे आले असते? परिणामी, फक्त विक्रेत्यांवर कारवाई करून खरा सूत्रधार मोकळा राहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गॅस सिलेंडर अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे आणि त्याचा चुकीच्या पद्धतीने साठा किंवा वाहतूक केल्यास मोठ्या दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे फक्त लहान विक्रेत्यांवर नाही, तर या साखळीतील सर्व जबाबदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी छापा टाकून विक्रेत्यांवर कारवाई करून काळाबाजाराच्या व्यवसायाला आळा घालण्याचा प्रयत्न केला असला, तरी वितरकांवर कारवाई कधी होणार, हा मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. ज्या वितरकांच्या माध्यमातून हे गॅस सिलेंडर अवैध बाजारात पोहोचतात, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल का? याकडे संपूर्ण शिरवळवासीयांचे लक्ष लागले आहे.
आता प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेट उघडकीस आणणार का, की फक्त छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करून प्रकरण दाबले जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
क्रमशः नागरिकांची अनास्था, पोलिस प्रशासनाची पाठराखण