शिरवळ (ता. खंडाळा) – सामाजिक सेवा, आरोग्य, शिक्षण व जनहिताच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा च्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.
या समारंभात रो. अनिल माने यांनी अध्यक्षपदाची, तर रो. डॉ. स्वप्निल लिमण यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. डॉ. विनय जोगळेकर यांनी केले. यावेळी २०२४-२५ चे माजी अध्यक्ष रो. राहुल तांबे, माजी सचिव रो. फिरोज पठाण व खजिनदार रो. कृष्णांत ढवळे यांचा यांच्या मागील कार्यकाळातील उल्लेखनीय कामा बाबत विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला असिस्टंट गव्हर्नर रो. संदीप भागवत, रो. हेमंत मोंडकर यांच्यासह क्लबचे अनेक सदस्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा यांच्यावतीने यापूर्वी आरोग्य शिबिर, रक्तदान मोहीम, शैक्षणिक मदत, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात आले असून, त्याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील आणि सामाजिक परिवर्तनासाठी क्लब महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुबक व प्रेरणादायी होते. टाळ्यांच्या गजरात नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.