मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच मतदारसंघातील धुसफूस आणि दावे यामध्ये चढाओढ होताना दिसून येत आहे. याचाच परिणाम अनेक पक्षांवर होताना दिसत आहे. अनेक नेते नाराजीतून पक्षाला रामराम करीत आहेत. अशातच आज काँग्रेसचे नेते आणि खासदार मिलिंद देवरा यांनी आज कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.
शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश
दक्षिण मुंबई मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मिलिंद देवरा यांचा भाजप युतीमधील प्रवेश कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. कॉंग्रेसची मोठी ताकद यामुळे कमी होणार आहे. मिलिंद देवरा हे शिवसेना (ठाकरे गट) दक्षिण मुंबई या मतदारसंघावर दावा सांगत असल्याने आणि निवडणुकीचे आश्वासन न मिळाल्याने पक्षाला रामराम करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. ते आज शिवसेनेतून बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटात पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.
आहे. तर एकेकाळी मिलिंद देवरा यांच्या वडिलांना सन 1976–77 यावेळी झालेल्या मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता अन् त्यावेळी ते जिंकले होते.
शिवसेनेच्या पाठिंब्याने मिलिंद देवरा यांचे वडील महापौरपदी
सन 1976–77 या कालावधीसाठी मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक झाली होती. त्यावेळी जनता पक्षाकडून सोहनसिंग कोहली व काँग्रेसकडून मुरली देवरा महापौरपदाच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी कोहली यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐनवेळी आपला निर्णय बदलला आणि मतदान करताना काँग्रेसचे उमेदवार मुरली देवरा यांना शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मतदान करावे, असे आदेश दिले. त्यावेळी शिवसेना महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला.
मुरली देवरा कोण होते?
मुरली देवरा हे मूळचे राजस्थानचे. पण, जन्मभूमी आणि कर्मभूमी मुंबई. मुरली देवरा यांनी अर्थशास्त्रात पदवी तर मिळवली होती. त्याचे आर्थिक आणि राजकीय गणित अगदी पक्क होतं. १९६८ साली त्यांनी मुंबई महानगरपालिकेची पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि नगरसेवकपदी निवडून आले. त्यांचे सर्व पक्षाच्या नेत्यांशी अगदी घरगुती संबंध होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुंबईचा महापौर बनवले होते. १९८१ साली मुरली देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनले ते थेट २२ वर्षांनी २००३ साली ते पायउतार झाले होते.
पुढे मुरली देवरा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आले. त्यांनी दक्षिण मुंबई हा आपला गडच बनवला होता. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
पेट्रोलियम खात्याचा मंत्री म्हणून पदभार
जेव्हा काँग्रेस पुन्हा सत्तेत आली व मनमोहन सिंग पंतप्रधान बनले तेव्हा मुरली देवरा यांच्याकडे पेट्रोलियम खात्याचा मंत्री म्हणून पदभार सोपवला. पुढे त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच मिलिंद देवरा यांना राजकारणात आणलं. तेही पुढे मंत्री झाले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनले पण मुरली देवरा यांचा करिष्मा त्यांना जमला नाही. आज त्यांनी काँग्रेसमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एकेकाळी शिवसेनेने मुरली देवरा यांना पाठिंबा दिला होता. वडिलांना महापौर बनवलेल्या शिवसेनेत आज मिलिंद देवरा जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.