शिरवळ : कृष्णा परिवाराने सर्वसामान्यांसाठी झटत राहण्याची परंपरा कायम ठेवत शिरवळ येथे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नूतन कॅम्पसची उभारणी सुरू केली आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य समारंभ आज आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात कुलपती डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी उत्तरा भोसले यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजनाने झाली. यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आपल्या भाषणात शिरवळ व परिसराच्या विकासासाठी या कॅम्पसचा मोठा उपयोग होईल, अशी ग्वाही दिली. “कृष्णा परिवाराने नेहमीच लोकांमध्ये आपलेपण निर्माण केले आहे, लोकांचा हा विश्वास कायम ठेवत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे ते म्हणाले.
आमदार भोसले यांनी कराड दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. “स्वर्गीय जयवंतराव भोसले व डॉ. सुरेश भोसले यांचे मार्गदर्शन आणि संस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा आदर ठेवून आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीला अनुसरून विकासकामे करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात गौरवी भोसले, विनायक भोसले, वसुंधरा भोसले, डॉ. जयवर्धन भोसले, श्वेतांजली भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कृष्णा विश्व विद्यापीठाचे सल्लागार डॉ. प्रविण शिंगारे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य दिलीप पाटील, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, शिंदेवाडीच्या सरपंच अनिता मळेकर, शिरवळचे सरपंच रविराज दुधगावकर, डॉ. विनय जोगळेकर, डॉ. शैलजा जोगळेकर, ॲड बाळकृष्ण पंडित, शिवाजीराव थोरात, माजी जि. प. अध्यक्ष उदय कबुले, जयवंत जगताप, कराडचे माजी नगरसेवक अतुल शिंदे, सुहास जगताप, आप्पा माने, शिवाजीराव पवार, मोहनराव जाधव, धनाजी जाधव, डॉ. सारिका गावडे, भगवानराव पाटील, बळवंतराव पवार आदींसह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी व मान्यवर प्रमुख उपस्थित होते.तसेच कृष्णा कारखान्याचे संचालक आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती.
शिरवळ परिसरातील सरपंच अनिता मळेकर आणि रविराज दुधगावकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी आणि मान्यवरांनी कृष्णा कॅम्पसच्या माध्यमातून या परिसराला शैक्षणिक व औद्योगिक प्रगतीची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कृष्णा विश्व विद्यापीठाचा शिरवळ कॅम्पस येत्या काळात स्थानिक युवकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक व आर्थिक प्रगतीस चालना देईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.