वडवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा): भाटघर धरणाच्या जवळ असलेल्या अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड टेक्नॉलॉजीला सोमवारी (ता. ६) बँक ऑफ बडोदाने न्यायालयीन आदेशानुसार टाळे ठोकले. ३२ कोटी ३ लाख ९० हजार १५६ रुपयांच्या थकबाकीमुळे बँकेने या महाविद्यालयाची मालमत्ता जप्त केली आहे.
बँकेच्या वतीने १४ हेक्टर ६७ आर क्षेत्रावरील इमारती व मालमत्तेचा ताबा घेण्यात आला आहे. सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर वसतीगृहातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांना बाहेर काढत बँकेने सर्व परिसर सील केला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॉलेज प्रशासन व बँकेदरम्यान चर्चेचे प्रयत्न सुरू असून, ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा विचार आहे, असे कॉलेजचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे नुकसान, भविष्याची चिंता
या कारवाईमुळे १,१०० डिप्लोमा विद्यार्थी, ५५० डिग्री विद्यार्थी आणि २५० इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षांबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. काही विद्यार्थी रडत-रडत वसतीगृहातून बाहेर पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
कर्ज थकबाकीमुळे जप्तीची कारवाई
२००९ मध्ये सुरू झालेल्या या कॉलेजमध्ये ४.१९ लाख चौरस फूट बांधकाम असून, सुमारे १०० कोटींच्या मालमत्तेसह वडवाडी कॅम्पसमध्ये सुमारे १३२ कोटींची मालमत्ता आहे. मात्र, बँकेकडे थकीत राहिलेल्या ३२ कोटी रुपयांच्या कर्जामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी बँक अधिकाऱ्यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे तेव्हा ती कारवाई लांबणीवर पडली होती.
कॉलेज प्रशासनाचे प्रयत्न सुरू
“विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. बँक प्रशासनाशी बोलणी सुरू असून कॉलेज लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था केली जाईल,” असे राजीव जगताप यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा पुढचा मार्ग?
या प्रकरणामुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत चर्चेतून तोडगा न निघाल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.