शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळ येथे डॉ. जोगळेकर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक टेस्ट ट्युब बेबी सेंटरचे उद्घाटन शुक्रवार, दि. २४ रोजी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. विनय जोगळेकर, डॉ. शीला जोगळेकर, डॉ. ओंकार जोगळेकर, डॉ. चारुता जोगळेकर, डॉ. अमित राजबाडे आणि डॉ. अशोक राजवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिध्द स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. पराग बिनीवाले उपस्थित राहणार आहेत. या नव्या टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या माध्यमातून गर्भधारणेसाठी संघर्ष करणाऱ्या दांपत्यांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. नैसर्गिक गर्भधारणेतील अडचणी सध्याच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे वाढत असून, अशा दांपत्यांना मानसिक व शारीरिक आधार देणे हे या सेंटरचे ध्येय आहे.
या सेंटरमुळे शिरवळ आणि परिसरातील खंडाळा, भोर, सासवड आणि वेल्हा तालुक्यातील नागरिकांना मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज राहणार नाही. अत्याधुनिक आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या सेंटरमध्ये कर्तव्यदक्ष वैद्यकीय टीम नेहमी उपलब्ध असेल.
उद्घाटन सोहळ्यानंतर सायंकाळी “टेस्ट ट्युब बेबी : बंध्यत्वपीडितांसाठी वरदान” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ. पराग बिनीवाले उपस्थित राहून सहभागी दांपत्यांशी संवाद साधणार आहेत.
शिरवळमध्ये अशा उच्चस्तरीय तंत्रज्ञानाचा वापर करून उभ्या राहिलेल्या या सेंटरमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत डॉ. विनय जोगळेकर यांनी व्यक्त केले. या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.